कोल्हापूर: महाविकास आघाडीची मनापासून झालेली एकजूट, सर्व नेत्यांनी लावलेली ताकद, माघार घेतलेल्या मातब्बरांनी केलेली प्रामाणिक मदत आणि गृहराज्यमंत्री यांची यशस्वी व्यूहरचना यामुळे शिक्षक मतदार संघात प्रा. जयंत आसगावकर यांच्या रूपाने काँग्रेसचा झेंडा फडकला. याउलट कृती समितीत पडलेली फूट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांची एकाकी झुंज आणि संघटनांच्या ताकदीमध्ये असलेल्या मर्यादा याचा काँग्रेसच्या विजयाला हातभार लागला. ( Latest Updates )

वाचा:

शिक्षक मतदार संघाशी आपला काही संबंध नाही, असे समजून आतापर्यंत दोन्ही काँग्रेसचे नेते या निवडणुकीकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे या मतदार संघात अलिकडच्या काळात ना कधी काँग्रेसचा झेंडा फडकला ना राष्ट्रवादीचा. यंदा मात्र ‘तुम्ही काँग्रेसला उमेदवारी द्या, निवडून आणण्याची जबाबदारी माझी’असा शब्द गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला. त्यानुसार प्रा. जयंत आसगावकरांना उमेदवारी मिळताच त्यांची यंत्रणा कामाला लागली. अतिशय सुक्ष्म नियोजन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. मतदारांना गृहित न धरता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची खेळी उपयोगी पडली. दुसरीकडे ते आपलेच आहेत असे समजून भाजपने मतदारांना गृहित धरल्याने त्यांना मोठा दणका बसला.

वाचा:

प्रा. आसगावकरांच्या विजयात महाविकास आघाडीची एकजूट आणि सतेज पाटील यांची व्यूहरचना याचाच प्रमुख वाटा आहे. पक्षाच्या वतीने लढण्यासाठी दादा लाड, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील असे मातब्बर इच्छूक होते. या सर्वांची माघार घेण्यापासून ते त्यांची पूर्ण ताकद पक्षाच्या मागे उभी करण्यात मंत्री पाटील यांनी मोलाची भूमिका पार पाडली. आसगावकर जसे शिक्षक आहेत, तसे ते संस्थाचालक आहेत. संस्थाचालक संघटनेचे सचिव आहेत. त्यामुळे सारे संस्थाचालक त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्याचाही मोठा फायदा त्यांना झाला.

चंद्रकांत पाटील यांचा एकाकी लढा

काँग्रेससमोर आव्हान होते ते आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार आणि टीडीएफ चे जी. के. थोरात या तिघांचे. राज्य कृती समितीत उभी फूट पडल्याने सावंत यांची ताकद विभागली गेली. थोरात पुण्याचे असल्याने इतर चार जिल्ह्यात त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पवारांच्या प्रचारापेक्षा भाजपने पदवीधरमध्येच अधिक ताकद लावली. त्यामुळे पवारांना म्हणावे तेवढे पक्षाची ताकद मिळाली नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकीकडे एकदिलाने लढत असताना दुसरीकडे मात्र भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा एकाकी लढा सुरू होता. त्याचाही परिणाम झाला. कोल्हापूरला यापूर्वी कधीही उमेदवारी मिळाली नव्हती, यंदा ती संधी मिळाल्याने या जिल्ह्याचा आमदार करायचा या निर्धाराने सारे एकदिलाने प्रचारात उतरले. आसगावकरांनी तीन चार वर्षे चांगली तयारी केली होती. त्याचाही फायदा त्यांना झाला.

वाचा:

यापूर्वी राष्ट्रवादी अथवा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उतरत नव्हते. यंदा मात्र पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघात या दोन्ही पक्षानी मोठी ताकद लावली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घातल्याने प्रचाराला ताकद आली. पुण्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोठी ताकद मिळाली. दोन्ही मतदारसंघात केलेला प्रचार एकमेकांना पूरक ठरला. यातून किमान हवा निर्माण झाली. ही हवाच विजयापर्यंत पोहोचविण्यास पूरक ठरली.

आसगावकर यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर
या मतदार संघाची निवडणूक ही पक्षीय पातळीपेक्षा संघटनात्मक पातळीवर होत असते. यावेळी प्रथमच ती पक्षीय पातळीवर झाली. काँग्रसने भाजपला आव्हान दिले. यामुळे इतर संघटनाची ताकद कमी पडली. काही संघटनांची ताकद विभागली. कृती समिती, शिक्षक भारती, टीडीएफ, शिक्षक परिषद यासह अनेक संघटनांची मतदारापर्यंत पोहोचण्यात दमछाक झाली. याउलट काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र सर्वसामान्य निवडणुकीप्रमाणे प्रचारात उतरले. आमदार सावंत यांच्या निष्क्रीयतेचाही त्यांना फटका बसला. नवीन आमदार आसगावकर यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याबरोबरच संस्थाचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेसचा आमदार म्हणून आता अपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आसगावकरांना अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता आहे.

वाचा:

सतेज पाटील यांची ताकद वाढली
तुम्ही उमेदवारी द्या, तुम्हाला आमदार देतो म्हणत पक्षाला जागा घेतल्यानंतर त्याच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या सतेज पाटील यांनी यश मिळाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी योग्य नियोजन केले. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेत चार आमदार निवडून आले. त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा पाचवा आमदार निवडून आणला आहे. यामुळे राज्यातील त्यांची राजकीय ताकद वाढली आहे.

का जिंकली काँग्रेस?

– महाविकास आघाडीची मनापासून एकजूट
– सतेज पाटील यांची व्यूहरचना
– मातब्बरांनी माघार घेऊन दिलेला पाठिंबा
– कृती समितीत पडलेली उभी फूट
– भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची एकाकी झुंज
– कोल्हापूर व सांगलीत काँग्रेसला झालेले मतदान
– जी. के. थोरात, जितेंद्र पवारांच्या प्रचारावर मर्यादा
– संस्थाचालकांनी काँग्रेसच्या मागे उभी केलेली ताकद

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here