विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत (MLC Election Results) भाजपचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या निवडणुकीत दणदणीत यश मिळवलं आहे. या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी भाजपला पुरतं घेरलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर, विशेषत: चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे,’ असं शिवसेनेनं सुनावलं आहे. ‘वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल,’ अशी तिखट टीकाही शिवसेनेनं केली आहे.
पाटलांची खुमखुमी जिरली आहे!
एका पक्षाविरुद्ध तिघे लढल्यानं पराभव झाला असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘आम्ही सर्वशक्तिमान आहोत. एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची () एकदिलाने लढली. भाजप-शिवसेना एकत्र असताना शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून भाजपनं धडा घ्यावा, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे:
>> पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे.
>> सगळ्यात धक्कादायक निकाल नागपूरचा आहे. गेल्या पाच दशकांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजप विजयी होत आहे. संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत आहे, तरीही नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा पराभव झाला. काँग्रेसचे अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. विधानसभा निवडणुकांतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते? बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला. त्यामुळे भाजपनेही फार मनास लावून घेऊ नये.
वाचा:
>> पुणे पदवीधरसुद्धा भाजपचाच गड होता. सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष झाले. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी कोल्हापुरातून पुण्यात आले व आता त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्याचा पदवीधर मतदारसंघ भाजपने गमावला.
>> पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला. पुणे पदवीधर, शिक्षक हा तसा पांढरपेशांचा मतदारसंघ पण बहुधा सदाशिव पेठ, कसबा पेठ, कोथरूड, नाना पेठ, डेक्कन परिसरांतील मतदारांनीही चंद्रकांतदादांच्या आवाहनास झिडकारलेले दिसते.
वाचा:
>> स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे. लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळ्यातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय?
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times