कल्याण शिळ रोडवरून डोंबिवलीकडे येणाऱ्या रस्त्यावर बंदिश पॅलेस हॉटेलसमोर पालिका प्रशासनाकडून दोन महिन्यांपूर्वी गतिरोधक बनविण्यात आले आहेत. चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे होणारे टाळण्यासाठी बसविण्यात आलेल्या या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने वाहने आदळत असल्याची चालकांची तक्रार आहे. शुक्रवारी याच गतिरोधकावर कचरा वाहून नेणारी घंटागाडी आदळल्याने या गाडीतील तेलासारखा पदार्थ पडल्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. या रस्त्यावरून वेगाने आलेले दुचाकीस्वार एकामागे एक घसरल्याने त्यांना अपघातांना सामोरे जावे लागले. दिवसभरात या गतिरोधकावर सात दुचाक्या घसरल्या. दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. या गतिरोधकावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून या गतिरोधकाची उंची नियंत्रणात ठेवण्याबरोबरच त्यावर सूचना देणारे पट्टे मारले जावेत. त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधक असल्याची कल्पना येईल आणि वाहनाचा वेग कमी करता येईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असून काँग्रेस कमिटीने याबाबतचे निवेदन पालिका उपायुक्तांना दिले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times