अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या यांची हत्या करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला असून हे हत्यार पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहे. तर, या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे हा अद्याप पसार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ()

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. अवघ्या दोन दिवसात या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे पसार आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी ही माहिती दिली. जरे यांच्या गळ्यावर व खांद्याजवळ धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जखम झाली होती. हे धारदार शस्त्र चाकू असल्याचे तपासात समोर आले असून तो चाकू आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपी बोठेचा शोध सुरूच

रेखा जरे प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ ज. बोठे याला पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत. पोलिसांचे खबरे देखील अलर्ट झाले आहेत. बोठे याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ त्या माहितीची खात्री करून बोठे याला पकडण्यासाठी पथक पाठवत आहेत. बोठे याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here