डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शरद पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी भांडुप येथे रवाना झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेसुद्धा सोबत होते.
संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी त्यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबरोबर, राज्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. दरम्यान, शनिवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला होता. गेहलोत यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांनी संजय राऊतांची घेतलेली धावती भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसंच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंयज मुंडे हेदेखील पवारांच्या सोबत असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांच्यावर बुधवारी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी राऊत यांना काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ‘खाण्यापिण्यासोबत काही राजकीय पथ्यही डॉक्टरांनी पाळायला सांगितली आहेत. पुढचे काही दिवस कमी बोला. फार कामाचा ताण घेऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सोमवारपासून ‘सामना’त कार्यालयात रुजू होईन, असं राऊत म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times