म. टा. वृत्तसेवा, जेवणाच्या ताटावर बसलेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला लघुशंका आल्याने त्याने बसल्या जागी लघुशंका केली. यामुळे संतापलेल्या बापाने त्याला तापलेल्या उलथन्याने अंगावर चटके दिल्याची अंगावर शहारे आणणारी घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील सचिन कांबळी याने आतापर्यंत तीन विवाह केले असून आधीच्या दोन पत्नींचा मृत्यू झाला आहे. सचिनच्या दुसऱ्या पत्नीचा सहा वर्षांचा मुलगा आहे. आईविना पोरका असलेला हा मुलगा आपले वडील सचिन आणि सावत्र आईबरोबर राहतो. रात्री तो वडिलांबरोबर जेवायला बसलेला असताना त्याने बसल्या जागेवरच लघुशंका केली. यामुळे संतापलेल्या सचिनने तापलेल्या उलथन्याचे त्याच्या उघड्या अंगावर चटके दिले.

मुलाचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी आले असता त्यांना त्याच्या हातावर चटके दिसल्याने त्यांनी विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने वडिलांनी आपल्याला चटके दिल्याचे सांगितले. यानंतर नातेवाईकांनी सचिनला याप्रकरणी जाब विचारत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून मुलाला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रुग्णालयीन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर बापाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here