नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या विजयमाला माने यांनी संपूर्ण घटनाक्रमच आज उलगडला.
‘त्या दिवशी आम्ही पुण्यावरून येत होतो. रेखा जरे यांचा पाय दुखत होता, म्हणून त्यांनी सुरुवातीला मला कार चालवण्यास सांगितली होती. मात्र त्यांच्या मुलाने नंतर रेखा जरे यांना कार चालवण्यास सांगितले. त्यानुसार रेखा जरे यांनी कार चालवली. जातेगाव घाट येथे आमच्या कारसमोर दुचाकी आडवी घातली गेली. दुचाकीवर दोघे होते. कट का मारला? अशी विचारणा करत रेखा जरे यांच्याशी ते दोघे वाद घालायला लागले. त्याचवेळी मला एक फोन आला, मी फोनवर बोलत होते. त्यांनी जरे यांना मागे ढकलले आणि वार केले. हे पाहून कारमध्ये बसलेल्या त्यांच्या आई जोरात ओरडल्या. त्यावेळी मी जरे यांच्याकडे पाहिले. तेव्हा मला धक्काच बसला. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मी सुरूवातीला १०० क्रमांकावर फोन केला, पण तो लवकर लागेना. त्यानंतर मी मॅडमला दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. लगेच रेखा जरे यांना त्यांच्या मुलाने व मी कारमधील दुसऱ्या सीटवर शिफ्ट केले व मी कार चालवायला घेतली. गाडी सुपा टोल नाक्यावर आणली. तेथे रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेत रेखा जरे यांना शिफ्ट करून जिल्हा रुग्णालयात आणले,’ अशी माहिती माने यांनी दिली. हा सर्व घटनाक्रम सांगताना माने यांचे डोळे पाणावले होते. दरम्यान, पोलिसांनी आज, त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
पोलीस संरक्षणाची मागणी
‘या घटनेने मला मोठा मानसिक धक्का बसला आहे. माझी शुगर वाढली होती. त्यामुळे मी दोन दिवस फोन बंद ठेवले होते. माझी आईदेखील घाबरली होती. मी फरार वगैरे झाले नाही. मी महिला व बालविकास अधिकारी आहे. मी अनेक महिलांना व बालकांना न्याय देते. पण आता या घटनेनंतर मला भीती वाटत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज करून मला पोलीस संरक्षण मिळावे अशी विनंती केली आहे, ‘ असेही विजयमाला माने यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times