शहरातील अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या येवले अमृततुल्यच्या चहा मसाल्यामध्ये ‘टाट्राझीन’ सिंथेटिक हा खाद्यरंग मिश्रित असल्याचे आढळून आले आहे. म्हैसूर येथील प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतून ही बाब उघडकीस आली आहे. आता यामुळे येवले चहाच्या विरोधात न्यायालयीन खटला दाखल करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) प्रयत्न सुरु झाले आहेत.
नावाच्या देशातील १८५ पेक्षा अधिक फ्रंचाईजी असलेले अमृततुल्य प्रसिद्ध आहे. येवले चहाचे कोंढवा येथे येवले फूड प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे. त्या कंपनीतून देशातील १८५ पेक्षा अधिक फ्रंचाईजींना चहा पावडर, चहा मसाला, साखर यासारखे घटक पुरविले जातात. या संदर्भात एफडीएच्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोंढव्यातील कंपनीत त्यांनी तपासणी केली. २१ सप्टेंबर २०१९ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्या तपासणीत उत्पादनांची माहिती घेतली असता त्यांच्या चहा पावडर, चहा मसाल्याच्या पॅकिंगवर कोणत्याही प्रकारचे लेबल नसल्याचे आढळले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी चहा पावडर, साखर, चहा मसाल्याचे काही नमुने ताब्यात घेऊन ते राज्य आरोग्य प्रयोगशाळेला तपासणीला पाठविले होते. एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा साठा अधिक जप्त करण्यात आला होता.
‘राज्य आरोग्य शाळेने पाठविलेला अहवाल आम्हाला असमाधानकारक वाटत होता. त्यामुळे म्हैसूर येथील येथील प्रयोगशाळेत घेण्यात आलेले चहा पावडर, साखर, चहा मसाल्याचे चार नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन अहवाल काल रात्री प्राप्त झाले. त्या अहवालानुसार, येवले फूड प्रॉडक्ट्सच्या चहा मसाल्यामध्ये ‘टाट्राझीन’ हा सिंथेटिक खाद्यरंग मिश्रित असल्याचे आढळून आले आहे. हा खाद्यरंग वापरण्यास अथवा खाण्यास अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार परवानगी देण्यात आली नाही. हा खाद्यरंग मानवासाठी असुरक्षित खाद्यपदार्थ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येवले फूड प्रॉडक्ट्सवर आता आम्ही लवकरच न्यायालयीन खटला दाखल करणार आहोत,’ अशी माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times