म.टा. प्रतिनिधी, नगर: शिर्डी संस्थानने भक्तांसाठी पोषाखासंदर्भात लावण्यात आलेला वादग्रस्त बोर्ड तातडीने हटवा, अन्यथा १० डिसेंबरला लोकशाही मार्गाने आम्ही शिर्डीमध्ये येऊन हा बोर्ड काढू, असा पुन्हा एकदा इशारा भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा यांनी शिर्डी संस्थानला दिला आहे.

आज देसाई यांनी संस्थानाला तसे पत्र पाठवले आहे. तसेच शिर्डीतून आम्हाला अनेक धमक्या, काळे फासण्याची भाषा अनेकांकडून येत असल्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आमच्या जीविताचे काही बरेवाईट झाल्यास त्यास साई संस्थान जबाबदार राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले असून त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर थेट हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला होता. मात्र अद्याप हा बोर्ड हटवण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही १० डिसेंबरला हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले आहे. या पत्राची प्रत देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, नगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देखील पाठवली आहे.

देसाई यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘शिर्डी येथे देश – विदेशातून हजारो भक्त दररोज साईबाबांच्या दर्शनाला मोठ्या श्रद्धेने येत असतात. दर्शनाला येत असताना मंदिराचे पावित्र्य आपण कसे राखावे, याचे भान सर्व भक्तांना असते . शिर्डी संस्थानच्या माध्यमातून सर्व भक्तांनी भारतीय वेशभूषेतच मंदिरात दर्शनासाठी यावे, असा बोर्ड लावण्यात आलेला आहे. हा बोर्ड जाहीरपणे लावल्यामुळे तसेच त्यावर हा नियम लिहिल्यामुळे जरी संस्थानचे म्हणणे असेल की हे फक्त आवाहन आहे, तरी ती एक सक्ती आणि बळजबरीच आहे, असं या पत्रात नमूद केलं आहे.

आपल्या देशात संविधान आहे आणि संविधानानुसार सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कोणी काय बोलावे आणि कसे कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि अध्यात्मिक ठिकाणी म्हणजेच मंदिरांमध्ये कोणीही इतरांना लज्जास्पद वाटेल असे कपडे कोणीही घालत नाही. यामुळे हा बोर्ड लावण्यामागे नेमकी काय मानसिकता आहे किंवा काय अर्थकरण लपले आहे? हे सुदधा समजून येणे गरजेचे आहे, असंही या पत्रात मांडलं आहे.

श्रद्धा आणि सबुरी साईबाबांनी दिलेली शिकवण आहे, आणि आम्ही सुद्धा साईबाबांचे भक्त आहोत. त्यामुळेच आपल्याला विनम्रपणे आम्ही विनंती करत आहोत की या बोर्डमुळे जर वाद होत असेल आणि भक्तांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार साई संस्थानाच्या माध्यमातून हिरावून घेतला जात असेल, तर हा बोर्ड आपण तातडीने काढावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.

अशा पद्धतीचा वादग्रस्त आणि ड्रेस कोड संदर्भात सक्ती करणारा बोर्ड लावल्यामुळे संस्थानवर कायदेशीर कारवाई सुदधा होऊ शकते. त्यामुळे संस्थानाने लावलेला आवाहनाचा बोर्ड तातडीने काढावा. अन्यथा साई संस्थानने यात पुढाकार घेऊन मार्ग न काढल्यामुळे आम्हाला १० डिसेंबर रोजी लोकशाही मार्गाने शांततेत करोनाचे सर्व नियम पाळून दुपारी एक वाजता शिर्डीत येऊन बोर्ड काढावा लागेल याची नोंद घ्यावी. तसेच शिर्डीतून आम्हाला अनेक धमक्या, काळे फासण्याची भाषा अनेकांकडून येत असल्यामुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आमच्या जीविताला काही बरेवाईट झाल्यास त्यास साई संस्थान जबाबदार राहील, असेही देसाई यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here