मुंबईः आज राज्यात ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ हजार ३४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. दोन दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलं आहे तर, राज्याचा रिकव्हरी रेटही काही अंशी दिलासा देणारा आहे. दिवाळीनंतर करोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आता उतरणीला येत आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. राज्यात आज ४० रुग्ण करोनामुळं दगावले आहेत. राज्यातील करोना मृतांची संख्या आटोक्यात असल्यानं हा मोठा दिलासा ठरत आहे.

आज राज्यात ३ हजार ०७५ करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांचा आकडा १८ लाख ५५ हजार ३४१ पर्यंत पोहोचला आहे. आज ७ हजार ३४५ रुग्ण करोनामुक्त झाले असून राज्यातील रिकव्हरी रेट ९३. २८ टक्के इतके झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २. ५७ टक्के इतका आहे.

राज्यात सध्या ७५ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख १८ हजार ७२१ चाचण्यांपैकी १८ लाख ५५ हजार ३४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात ५ लाख ५५ हजार १८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, ५ हजार ५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here