दावोस येथे जागतिक आर्थिक मंच संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी खान यांनी ट्रम्प यांच्यासमोर काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता. ट्रम्प यांनीही भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या घटनाक्रमावर आपलं बारकाइनं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. मात्र भारताने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला आहे. काश्मीर मुद्दा हा नवी दिल्ली आणि इस्लामाबाद दरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा आहे. त्यात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असं भारतानं स्पष्ट केलं आहे. गेल्या पाच महिन्यात ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यासाठी चौथ्यांदा प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे ट्रम्प पुढच्या महिन्यात भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या या प्रस्तावाला अधिक महत्त्व आलं आहे.
इम्रान यांचा काश्मीर राग आळवणं सुरूच
दरम्यान, इम्रान खान यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यासमोर काश्मीरचा राग आळवला आहे. पाकिस्तान आणि भारतामधील वाद हा आमच्यासाठी मोठा मुद्दा आहे. या दोन्ही देशांमधील तणाव कोणताच देश दूर करू शकणार नाही. त्यामुळे अमेरिकेने हा तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आमची इच्छा आहे, असं इम्रान यांनी ट्रम्प यांना सांगितलं. तर भारत-पाकिस्तानमध्ये जे सुरू आहे. त्याबाबत आम्ही मदत करायला तयार आहोत. आमची इच्छाही आहे. आम्ही दोन्ही देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. ५ ऑगस्ट २०१९ रोजी बारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम रद्द केलं. त्यानंतर दोन केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली. त्यानंतरच दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.
दावोसमध्ये ट्रम्प आणि इम्रान यांनी पाकिस्तानशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना दौऱ्यावर आल्यानंतर पाकिस्तानलाही जाणार आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मी दावोसमध्ये भेटलोच आहे, असं सांगून ट्रम्प यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. याचा अर्थ ट्रम्प हे भारत दौऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचं सांगण्यात येतं. मात्र, ट्रम्प यांच्या विधानानंतरही पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ट्रम्प हे इस्लामाबादला येणार असल्याचा दावा केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times