म. टा. प्रतिनिधी, : टिकटॉकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन येथील एका महिलेने अल्पवयीन मुलाला घरी बोलवून त्याचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ४ जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली होती.

संजयनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या १६ वर्षीय मुलाची टिकटॉकच्या माध्यमातून माधवनगर येथील एका महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीतून महिलेने जुलै २०१९ मध्ये मुलाला सांगलीतील माधवनगर येथील घरी बोलवले. भेटायला नाही अलास तर माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईन, अशी धमकीही तिने दिली. यानंतर वारंवार घरी बोलवून त्याला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. हा प्रकार संबंधित महिलेच्या पतीच्या लक्षात येताच तिने मुलाच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली. यानंतरही महिलेकडून मुलाला त्रास देण्याचे प्रकार सुरूच असल्याने अखेर पीडित मुलाच्या वडिलांनी सोमवारी (ता. ७) महिलेच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरात घुसून तरुणीचे केले अपहरण

पलूस तालुक्यातील पुणदी येथे पिस्तूलाचा धाक दाखवत घरातून तरुणीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अपहृत तरुणीच्या आईने कुंडल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कृष्णात गावडे (रा. शिगाव, ता. पलूस) हा १५ ते १६ अनोळखी लोकांसह नागराळे रोड येथील फिर्यादी महिलेच्या घरात घुसला. पिस्तूल, तलवार, गुप्ती आणि काठ्यांचा धाक दाखवत त्यांनी घरातील तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. यावेळी विरोध करणाऱ्या तरुणीसह तिची आई, भाऊ आणि आजीला मारहाण केली. अपहृत तरुणीचा भाऊ आणि आजी झटापटीत जखमी झाले आहेत. या सर्वांना जीवे मारण्याची धमकी देत गावडेसह सर्व जण तरुणीला घेऊन निघून गेले. फिल्मी स्टाइल अपहरणाने परिसरात भीतीचे वातावरण आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार कृष्णात गावडे याच्यासह १५ ते १६ अनोळखी व्यक्तींविरोधात कुंडल पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here