गणेश वसईकर (रा. वसई) असे या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मे २०१८मध्ये वसईकर निवृत्त झाले होते. नौपाडा पोलीस ठाण्याच्या प्रॉपर्टी रूममध्ये कार्यरत असताना, जप्त मुद्देमालाच्या बनावट नोंदी ठेवून, २०.४८ लाखांची रोकड आणि ९७ हजार रुपयांचे दागिने लांबवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून वसईकर मे २०१८ मध्ये निवृत्त झाले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल परांजपे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जून २०१८मध्ये त्या नौपाडा पोलीस ठाण्याच्या प्रॉपर्टी रूममध्ये कर्तव्यावर होत्या. त्याआधी तिथे वसईकर हे कर्तव्यावर होते. प्रॉपर्टी रूममधील मुद्देमालाचे ऑडिट केले असता, जून २००७ आणि मे २०१८ मध्ये वसईकरांनी पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या मुद्देमालाच्या बनावट नोंदी करून, त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
यावर स्पष्टीकरण देण्यासाठी वसईकर यांना तीन वेळा नोटिशी पाठवल्या. मात्र, त्यांना काहीही उत्तर दिले नाही. १८ नोव्हेंबर रोजी वसईकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात येऊन या आरोपांचे खंडन केले. याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी २ डिसेंबर रोजी वसईकर यांच्याविरोधात भादंवि कलम ४०९, कलम ४२० आणइ कलम ४६७, कलम ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times