मुंबईः ‘महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झाला आहे. पण हा तानाजी प्रत्येक संकटातून बाहेर येईल,’ असा विश्वास शिवसेना आमदार यांनी व्यक्त केला आहे. प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी इडीच्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या पथकाने काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक घरावर छापेमारी केली होती. टॉप्स ग्रुपशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी केली होती. या सर्व घडामोडींनंतर आज प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

‘दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झाला आहे. पण ते तानाजी १६ व्या शतकातील होते हा तानाजी मालुसरे २१व्या शतकातील आहेत. ते तानाजी मालुसरे रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते पण हा तानाजी सक्षमपणे परिस्थितीला सामोरे जाईल,’ असं ठाम मत सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय, जगावरील करोनाचं संकट, शेतकऱ्यांवरील संकट टळो आणि सरनाईक कुटुंबावरील ईडापिडा टळो, यासाठी बाप्पाला गाऱ्हाण घातल्याचं त्यांनी सांगितलं.

ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार

‘ईडीही देशातील फार मोठी संस्था आहे. देशातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली आहेत. त्या संस्थेला मदत करणे ही माझी भूमिका या आधीही होती आणि नेहमी राहील. जेव्हा ईडीची नोटिस येईल तेव्हा चौकशीसाठी हजर राहिल. तसं पत्रही ईडीला दिलं आहे,’ असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

यांची चौकशी होणार का?

‘माझी संपत्ती ८०० कोटींची असेल तर मला आनंद आहे. पण भाजप नेत्यांना मला एकच सांगायचं आहे मंगलप्रभात लोढा, अर्णब गोस्वामी, सुधाकर शेट्टी, कंगना राणावत यांची करोडो रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या संपत्तींची चौकशी तुम्ही केली का?’ असा सवाल प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here