म. टा. प्रतिनिधी, पुणेः कंजारभाट समाजातील आणि जात पंचायतीला विरोध करून धनंजय आणि प्रियांका हे दोघे मंगळवारी विवाहबंधनात अडकले. ‘लग्नानंतर कौमार्य चाचणी झाली नाही तसेच जात पंचायतीची बैठक होऊ दिली नाही,’ असे धनंजयचे बंधू आणि ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ ही चळवळ चालवणारे विवेक तमायचीकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

पुण्यातील प्रियांका इंद्रेकर हिचा विवाह अंबरनाथ येथील धनंजय तमायचीकर याच्यासोबत वडगावशेरीतील विठ्ठलांजन कार्यालयात झाला. या लग्नाला दोन्ही कुटुंबीय तसेच या समाजाच्या चळवळीतील पुढारलेले तरुण- तरुणी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

धनंजय हा औरंगाबाद येथे मोठ्या खासगी कंपनीत नोकरी करतो. धनंजय आणि प्रियांका हे दोघेही चळवळीशी जोडलेले असून त्याच विचारातून त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा झुगारून बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने झालेले हे तिसरे लग्न आहे.

या विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवरही कंजारभाट समाजातील या अनिष्ट प्रथेविरोधातील मोहिमेला बळ द्यावे, अशी विनंती करण्यात आली होती.
‘आमचा कौमार्य चाचणीला विरोध आहे. दबाव झुगारून आम्ही लग्न केले आहे. आम्ही कौमार्य चाचणी करणार नाही तसेच याबाबत इतर तरुणांमध्ये जागृती करू,’ असे प्रियांका आणि धनंजयने सांगितले.

कंजारभाट समाजात स्वत:चे कायदे चालतात. ते नाकारून भारतीय संविधानाबद्दलची समज वाढावी यासाठी लग्नात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाकार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सांगितले. समाजामध्ये छुप्या पद्धतीने कौमार्य चाचणी होत असल्याची माहिती या समाजाच्या सुधारणा चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा इंद्रेकर यांनी दिली.

तरुणांनी साथ दिली तर बदल

विवेक सांगतात, ‘मी आणि ऐश्वर्याने १२ मे २०१८ रोजी लग्नामध्ये कौमार्य परीक्षा न देता हा पायंडा मोडून काढला. विवाह, लैंगिकता, परस्पर विश्वास या पती-पत्नीमधल्या वैयक्तिक बाबी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘राइट टू प्रायव्हसी’चा मुद्यावर भाष्य केले आहे. त्या आधारे या अनिष्ट प्रथेविरोधात ‘स्टॉप व्ही टेस्ट’ हे अभियान सुरू करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी पूनम मचले आणि शुभम मलके यांचा विवाह अशा पद्धतीने झाल्यानंतर
प्रियांका आणि धनंजय हे चाचणीला विरोध करणारे तिसरे जोडपे आहे. तरुणांनी साथ दिली तर बदल नक्की घडेल.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here