म. टा. प्रतिनिधी, पुणेः लोहगाव विमानतळावरील ( ) हवाई दलाच्या ताब्यातील अडीच एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे देण्यास संरक्षण मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आणि मालवाहतुकीला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विमानतळाच्या प्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार उपस्थित होते.

‘या विमानतळावर कार्गो सेंटरसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मालवाहतूक करण्यावर मर्यादा येत आहेत. चंदिगढ येथील एका इमारतीच्या बदल्यात लोहगाव विमानतळावरील अडीच एकर जागा विमानतळ प्राधिकरणास देण्यास हवाई दलाने तत्वत: मान्यता दिली आहे’ असे खासदार बापट यांनी सांगितले.

‘चंदिगढ येथील जागेबाबत हवाई दलाकडून विचारणा करण्यात आली होती. ती जागा लडाख, लेह या परिसरात जवानांची ने-आण करण्यासाठी आणि त्यांची उतरण्याची सोय करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानुसार या जागेच्या बदल्यात लोहगाव विमानतळावरील जागा प्राधिकरणाला देण्यास हवाई दलाकडून मान्यता मिळाली आहे’ असे खासदार बापट यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून करोनावरील लशीची निर्मिती करण्यात येणार आहे. ही लस देशात आणि परदेशामध्ये पाठविण्यासाठी लोहगाव विमानतळावर सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार असल्याची बाब खासदार बापट यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच याबाबतचे निवेदन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव प्रदीपसिंह खरोळा यांना देण्यात आले. याबाबत खासदार बापट म्हणाले, ‘सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण करण्यात येणाऱ्या लशीचे देशात आणि परदेशात वितरण होण्यासाठी खास व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी हवाई दलाच्या अडीच एकर जागेची गरज असल्याची भूमिका बैठकीत मांडली. या जागेवर बांधकाम करण्यास तातडीने परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणी नियोजित टर्मिनलचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी ही परवानगी आवश्यक आहे’ असे बापट यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here