मुंबई: बीडमधील मुंडे बहिण-भावातील वर्चस्वाची लढाई अद्याप थांबलेली नाही. पाटोद्यातील रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात नव्याने वादाची ठिणगी पडली आहे. यावरून आज पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले व स्पष्ट शब्दांत इशाराही दिला.

पंकजा समर्थक सरपंच पांडुरंग नागरगोजे यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याच घटनेवरून पंकजा यांनी बंधू व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यावरच बोट ठेवत पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडेही असले तरी जिल्ह्यात शांतता आणि सुख कायम राहावे, अशी आमची भावना होती. मात्र सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ इच्छित नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर दबाव टाकणे, दहशत माजवणे हेच सध्याच्या पालकांचे ध्येय दिसतेय. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. ‘सत्ता नसली तरी पुण्याई आहे आणि हिंमतही आहे…सामाजिक न्याय करा, अन्याय चालत नाही इथे’, असा टोलाही पंकजा यांनी दुसऱ्या ट्विटमधून लगावला आहे.

दरम्यान, पाटोद्यातील रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची व आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने ही मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे समर्थक आमनेसामने उभे ठाकले असून हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here