सकाळी आठच्या सुमारास वाट चुकलेला गवा महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसून आला. कुत्र्यांच्या हल्ल्यात हा गवा जखमी झाला होता. वनविभाग आणि महापालिकेच्या पथकानं रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं होतं.
जखमी अवस्थेतील गव्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे पथक आणि महापालिकेचे पथक तातडीने महात्मा सोसायटीच्या परिसरात पोहोचले. मात्र, गव्यानं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा देत सोसायटीतील दोन बंगल्यांमधील मोकळ्या जागेत घुसला. त्यापूर्वी गव्याने बंगल्यांचे गेट देखील तोडले होते. गव्याला पकडण्यासाठी चहूबाजूनं जाळी लावण्यात आली होती.
महात्मा सोसायटीमधून पसार झाल्यानंतर दुपारी १२च्या सुमारास उजवी भुसारी कॉलनीत घुसला. लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली होती. गव्याचा पाठलाग करत असतानाच तो पौड रोडवरील मुख्य रस्त्यावर पोहोचला होता.
दोरीच्या सहाय्याने गव्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र, तरीही गवा ताब्यात येत नसल्यानं वन कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन दिले. तरीदेखील गवा अधिकाऱ्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना जुमानत नव्हता. अखेरी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोरखंड्याच्या सहाय्याने गव्यावर नियंत्रण मिळवण्यास यश आलं असून गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात आलं.
रानगव्यात किती ताकद असते?
गवा हा प्राणी साधारणतः डोंगराळ परिसरात आढळतो. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यात आढळून येतात. गव्याचे मुख्य अन्न गवत आणि पाने आहेत. डोंगराळ प्रदेशातील गवत व पाने संपल्यानंतर कधीतरी गवा हिरवळ असलेल्या प्रदेशात जातात.
अत्यंत मजबूत आणि पिळदार शरीरयष्टी असलेला गवा हा सर्वात उंच असा प्राणी आहे. गव्याच्या शरीराची लांबी ८ ते १० फूट असतते तर उंची ५ ते ७ फूट. व सरासरी वजन ६५० ते १००० किलो पर्यंत असते. गव्याचे वजन आणि कळपात राहण्याच्या जीवनपद्धतीमुळं गव्यावर सहसा कोणतेही जंगली प्राणी हल्ला करत नाहीत. बिबट्या किंवा जंगली कुत्र्यांचे कळप कधी तरी गव्याच्या पिल्लांवर हल्ला चढवतात मात्र कळपातील इतर गव्याच्या साथीमुळं हे हल्ले अयशस्वी होतात.
वाघ हा एकमेव असा प्राणी आहे जो गव्याची शिकार करु शकतो. मात्र, गवा हा कळपात राहणारा प्राणी असल्यामुळं बऱ्याचदा वाघ हल्ला करण्याचे टाळतो. वाघ जेव्हा हल्ला करतो, त्यावेळेस कळपातील सर्व मोठे गवे आपल्या पिल्लांभोवती रिंगण करुन उभे राहतात त्यामुळं वाघ हल्ला न करताच माघारी फिरतो. कळपातील जखमी व वृद्ध गवे हे लगेचच वाघांच्या हल्लातील बळी ठरतात.
गव्याची मानवांसोबतची वर्तवणूक
गवे हे फार लाजाळू आणि घाबरट असतात माणसाची चाहूल लागताच ते तिथून पळ काढतात. मात्र, बऱ्याचदा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाल्यास गवा आक्रमक बनतात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times