मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेणाऱ्या एनसीबीच्या पथकाने मुंबईत मोठ्या ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीने ड्रग सप्लायर आणि तस्कर रेगल महाकाल याला अटक केली आहे. रेगल हा बऱ्याच महिन्यांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. रेगल हा अनुज केशवानी नावाच्या एका अन्य आरोपीला ड्रग पुरवत होता आणि अनुज दुसऱ्यांदा ते पुरवायचा, अशी माहिती समोर आली आहे.
एनसीबीच्या पथकाने अंधेरीतील लोखंडवालामध्ये छापे मारले. यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि अंमली पदार्थ आढळून आले. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीने याआधी अनेक जणांना ताब्यात घेतले होते. त्यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वीच शौविक चक्रवर्तीला जामिनावर सोडण्यात आले आहे.
अडीच कोटींची मलाना क्रीम जप्त
एनसीबीने बुधवारी दोन ड्रग सप्लायरना अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो मलाना क्रीम जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २.५ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ लाखांची रोकडही जप्त केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times