शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूवारी, २३ जानेवारीला होणाऱ्या शिवसेना वचनपूर्ती जल्लोष सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांचा जाहीर सत्कार होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६मध्ये शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेच्या पहिल्या फळीतील ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार होईल. मुंबईतील शिवसैनिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष कार्यक्रमात शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, नीलेश साबळे, भाऊ कदम, अजय-अतुल, सुखविंदर सिंग, शिवमणी आदी कलाकार सहभागी होणार आहेत.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेनेचे स्वरूप आता बदलले असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या सोहळ्यात शिवसेना स्थापन करणाऱ्या जुण्याजाणत्या शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार करून आजही पूर्वीचीच शिवसेना कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times