राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना मृतांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहेत. आज राज्यात एकूण ७५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून या आजाराने एकूण ४७ हजार ९०२ इतके रुग्ण दगावले आहेत. राज्यातील करोना मृत्यूदर २. ५७ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात करोना मृतांचा आलेख झपाट्याने खाली येत असून आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळत आहे.
राज्यात आज नवीन करोना बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. आज एकाचवेळी ४ हजार ९८१ नवीन करोना रुग्ण सापडले आहेत तर, ५ हजार १११ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ४२ हजार १९१ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट (Recovery Rate) ९३. ४५ टक्के इतका झाला आहे. दिवाळीनंतर करोनाचे हे आकडे दिलासा देणारे ठरले आहेत.
करोना मृतांचा व करोना बाधितांचा आकडा कमी होत असतानाच राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होतेय. राज्यात सध्या ७३ हजार १६६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १४ लाख ४७ हजार ७२३ चाचण्यांपैकी १८ लाख ६४ हजार ३४८ चाचण्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख ४३ हजार ०९१ व्यक्ती होम क्वारंटाइमनध्ये आहेत. तर, ५ हजार १०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times