शहरातील टि. व्ही. सेंटर भागात अॅकव्हेंजर दुचाकीवर संजय गांधी मार्केट मध्ये १००,२०० आणि २ हजार रुपयांच्या चलणी नोटासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा घेऊन खरेदी करण्यासाठी फिरत असल्याची माहिती एका गुप्त माहितीदाराकडून सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरिक्षक गिरी यांनी पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब आहेर यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सुचना केली. पोलिस उपनिरिक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून सायंकाळ साडेपाच वाजेच्या सुमारास अवेंजर दुचाकीवर एमएच २० एएस २९२९ फिरणाऱ्या संदीप श्रीमंत आरगडे (३२, रा.नाथनगर, वैतागवाडी, ईटखेडा पैठण रोड) व निखील आबासाहेब संबेराव (२९, रा. पहाडसींगपुरा) या दोघांना जयभद्रा पान सेंटरजवळ ताब्यात घेतले. या चलनी नोटा त्यांच्याकडे कोठून आल्या याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदरील नोटा आकाश संपती माने (३२, रा. जाधव गल्ली, ता. धारूर जि. बीड) याच्याकडून छापून घेतल्या.
पोलिसांनी तात्काळ एक पथक धारूर येथे पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले. या आकाश माने याने त्याच्या येथे छापल्याची कबुली दिली. तिनही आरोपीकडून आतापर्यंत तब्बल २ लाख ७६ हजार ४५० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य प्रिंटर, लॅपटॉप, पेनड्राईव असे ९३ हजार ८०० रुपयांचे साहित्य असा एकुण ३ लाख ७० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बनावट नोटा प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रविण पाटील करीत आहे.
ही कारवाई पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब आहेर, पोहेका. दिनेश बन, सुभाष शेवाळे, नरसंग पवार, पोलिस नाईक विजयानंद गवळी, प्रकाश डोंगरे, विशाल सोनवणे, सुरेश भिसे गणेश नागरे, स्वप्नील रत्नपारखी, लालखा पठाण आदींनी केली.
कागदामुळे नकली नोटांची पटली ओळख
धारूर येथील सेवा केंद्रावर छापण्यात आलेल्या नोटा या हुबेहूब दिसल्यासाठी संबंधीताने बराच प्रयत्न केला होता. सिडको भागात या बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्यांने नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, बनावट नोटा तयार करण्यासाठी हलक्या प्रतीचा कागद वापरण्यात आल्याने, हे बिंग फुटल्याची माहिती समोर आली आहे.
अशी होती ऑफर
वीस हजार रूपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात १ लाख रूपयांच्या बनावट नोटा विक्री करीत असल्याची माहिती संदीप आरगडे व निखील संभेराव यांनी पोलिसांना दिली. दोघांच्या ताब्यातून जप्त केलेल्या नोटापैकी अनेक नोटांचे क्रमांक हे एकसारखेच असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.
मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
कोर्टात तिघांना हजर केले असता, कोर्टात सरकारी वकील जयमाला राठोड यांनी न्यायलयात नकली नोटांचे रॅकेट मोठे असण्याची शक्यता आहे. तसेच या लोकांनी आणखी किती ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची कोर्टाकडे मागणी केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य करून आरोपींना ११ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times