म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज, गुरुवारी गोरेगाव येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज्यातील बदलत्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करतानाच पक्षाचा नवा झेंडा आणि भूमिका जाहीर करणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षाच्यावतीने राज्यात सरकार स्थापन केल्याने सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत पडद्यामागून नव्या मित्रपक्षाची चाचपणी देखील या अधिवेशनाच्या माध्यमातून मनसे करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून मनसेकडून गोरेगावला महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर, समान नागरी कायदा यासारख्या प्रश्नावरून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याला कशी बगल देत आहे, याविषयीभूमिका मांडणार असल्याचे कळते. या महाअधिवेशनाच्या माध्यमातून पक्षाचा नवा झेंडा आणि पक्षाची नवी भूमिका देखील राज ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात राज ठाकरे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी मनसेचा नवीन झेंडा आणि मनसेची नवीन दिशा (टॅगलाईन ) यांचे अनावरण होईल. त्यानंतर प्रमुख वक्ते आणि नेते यांची भाषणे, विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबतचे ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात आली आहे. त्या सूचक- अनुमोदन दिले जाईल. दुपारच्या जेवणानंतर काही वक्ते आणि नेते यांची भाषणे होतील. तिसऱ्या सत्रात राज ठाकरे यांचे भाषण होणार असून त्यात पक्षाची नवी दिशा, पक्षबांधणी, पक्षाचा नवीन झेंडा याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.

झेंड्याला ब्रिगेडचा विरोध

मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असेल अशी माहिती पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या ट्विटच्या माध्यमातून पुढे आली आहे. पक्षाच्या नव्या झेंड्यावर सोनेरी रंगाच्या षटकोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिले असेल अशी माहिती पक्षातील एका नेत्याने दिली. सुलेखनकार अच्युत पालव यांनी हे डिझाइन केले असल्याचेही समजते. मात्र राजमुद्रेला संभाजी ब्रिगेडने विरोध केला असल्याने या विरोधाचा बंदोबस्त मनसे कशी करणार याविषयी चर्चा सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here