दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. सत्यजित तांबे यांनीही दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांच्या घरावर उद्या जाब विचारण्यास आमचे युवक कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले.
‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मागेपण शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. आताही शेतकर्यांच्या आंदोलनाला ते कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये पाकिस्तान, चीन असे नवनवीन मुद्दे काढून शेतकऱ्यांच्या मुद्दापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांविषयी असलेली त्यांची भावना सातत्याने दानवे यांच्या बोलण्यात मधून आजपर्यंत समोर आली आहे. या सर्वाचा जाब विचारण्यासाठी उद्या सकाळी अकरा वाजता दानवे यांच्या जालना येथील घरी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जातील, असं तांबे यांनी सांगितलं.
‘गेल्या तीन आठवड्यांपासून हरियाणा, पंजाब व आजूबाजूच्या राज्यातील शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील दिल्लीत आंदोलन करीत आहेत. परंतु त्यांच्याशी बोलायला सुद्धा भाजपच्या नेत्यांना वेळ नाही. केंद्र सरकारला वेळ नाही,’ असा आरोपही तांबे यांनी केला. ‘आज केंद्रीय कृषिमंत्री यांनी मुलाखत दिली. मात्र ते बोलताना वेगळ्याच मुद्द्यावर बोलले. भरकटणारे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असून मूळ मुद्यावर चर्चा भाजपकडून होताना दिसत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times