लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०. रा. हजारीपहाड) आणि यश धुर्वे (वय १०) अशी या मृतकांची नावे आहेत. लक्ष्मीबाई यांच्या २० वर्षीय नातीची आणि आरोपीची ओळख होती. मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध होते की नाही याची पुष्टी होऊ शकली नाही. आरोपीचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम असल्याचेही सांगितले जात आहे. या तरुणीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिचे वडील मोहन हे पेंटिंगचे काम करतात. आरोपी हा या तरुणीपेक्षा वयाने लहान होता. तसेच अन्य विविध कारणांमुळे या तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोपीला विरोध होता.
काही दिवसांपूर्वी याबाबत त्यांच्यात एक बैठक झाल्याचे कळते. या बैठकी दरम्यान आरोपीने इथून पुढे या तरुणीला संपर्क साधू नये असे ठरले. यावरून आरोपी चिडला होता. त्यानंतरही तो वारंवार तिला फोन करीत असे. मात्र, या तरुणीने फोन व मेसेजला प्रतिसाद देणे बंद केले. तिचे वडील फोन उचलत असत आणि आरोपीने आपल्या मुलीपासून दूर रहावे असे त्याला सांगत. यामुळे आरोपी चिडला होता. ‘मै तुम्हाले पुरे खानदान को मिटा दुंगा,’ अशी धमकीही त्याने दिल्याचे समजते. आरोपी तिला भेटण्यासाठी घरी येत असल्याने या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला एका नातेवाईकाकडे पाठविण्यात आल्याचे कळते. त्यामुळे आरोपीला तिला भेटणे अशक्य झाले. यातून त्याचा पारा अधिकच चढला.
यशने केला प्रतिकार
आरोपीने रागाच्या भरात या तरुणीचे हजारीपहाड येथील घर गाठले. ती घरी नव्हतीच. घरी केवळ लक्ष्मीबाई आणि यश हे दोघेच होते. ‘मला तिला भेटायचे आहे. तिला कोणत्या नातेवाईकाकडे ठेवले आहे?,’अशी विचारपूस त्याने लक्ष्मीबाई यांच्याकडे केली. त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. आरोपीने रागाच्या भरात त्यांच्या पोटावर चाकुने सपासप वार केले. यावेळी लक्ष्मीबाई खुर्चीत बसल्या होत्या. हा हल्ला इतका भयंकर होता की, खुर्चीत बसल्या बसल्याच त्यांनी प्राण सोडल्याचे समजते. त्यानंतर आरोपीने यशवरही हल्ला चढविला. त्याने सुरुवातीला वायरने यशचा गळा आवळून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशने पळण्याचा तसेच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यानंतर आरोपीने त्याच्याही पोटावर चाकुने हल्ला केला. यात यशचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
कांबळे हत्याकांडाच्या स्मृती जाग्या
या घटनेने कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या स्मृती जाग्या झाल्या. १७ फेब्रुवारी २०१८ला सायंकाळी ७ च्या दरम्यान हे दुहेरी हत्याकांड घडले होते. उषाताई सेवकदास कांबळे (वय ५४) आणि आणि त्यांची दीड वर्षीय नात राशी कांबळे या दोघींची हत्या करून त्यांचा मृतदेह पोत्यात भरून विहीरगांव येथील एका नाल्यात फेकून दिला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times