म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रशिक्षण व्हिडीओमधील छेडछाडीबाबतची हलगर्जी, दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाला जबाबदार धरून राज्य शासनाने राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त व वादग्रस्त सहकारी संस्था निबंधक यांना बुधवारी निलंबित केले. सहकार विभागाने त्यांच्यावरील कारवाईचे आदेश काढले आहेत. सोनी यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचाही कार्यभार होता. या प्रशिक्षण व्हिडीओचे यूआरएल उघडल्यावर चक्क कँडीक्रश हा खेळ सुरू होत होता.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी एक प्रशिक्षण व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी विभागानेही हा प्रशिक्षण व्हिडीओ एस. एम. एस. प्रणालीद्वारे एम. किसान पोर्टलवर उपलब्ध शेतकऱ्यांच्या मोबाइल क्रमांकावर उपलब्ध करून दिला. मात्र, कृषी आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमध्ये छेडछाड झाल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली होती.

या चौकशीत सोनी यांनी ७ जानेवारी २०२० रोजी ईमेलच्या माध्यमातून दोन वेगवेगळी पत्रे कृषी आयुक्तांना पाठवली आहेत. पहिल्या पत्रात त्यांनी योजनेचा चुकीचा यूआरएल (लिंक) देऊन कृषी आयुक्तांची दिशाभूल केली. तर दुसऱ्या पत्रात अचूक युआरएल पाठवून त्यावर कृषी आयुक्तांची पोचपावती घेतल्याचे दिसून आले आहे. दुसरे पत्र पाठवताना त्यांनी आधीच्या पत्रातील चुकीच्या यूआरएलचा कोणताही उल्लेख केलेला नाही. यामुळे कृषी आयुक्त कार्यालयाची दिशाभूल होऊन त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या मोबाइलवर जी लिंक पाठवण्यात आली त्यावर योजनेची चित्रफित न उघडता कँडीक्रश हा खेळ उघडला जात होता.

सोनी यांनी कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अशा प्रकारे लिंकची सुविधा उपलब्ध करताना चुकीची लिंक जाऊ नये यासाठी विशेष लक्ष देऊन काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्यांच्याकडून झालेली ही चूक अनवधानाने नसून हेतुपुरस्सर झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योजनेची बदनामी झालीच, शिवाय ही बाब निस्तारण्यासाठी सरकारला विविध पातळ्यांवर खुलासे करावे लागले. सहकार आयुक्तांना सोपविलेल्या कामामध्ये त्यांचा अक्षम्य हलगर्जी, दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने त्यांना २१ जानेवारी २०२० पासून निलंबित करण्यात आल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे. सहकार विभागाचे उपसचिव डॉ. सुदीन गायकवाड यांच्या स्वाक्षरीने कारवाईचा हा आदेश जारी करण्यात आला आहे.

यापूर्वीही वादग्रस्त
सोनी यांची या पूर्वीची कारकीर्दही वादळी आहे. मुंबई बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीवेळीही त्यांना मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या विरोधानंतरही फडणवीस सरकारने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. सहकार आयुक्तपदी सनदी अधिकारी नेमण्याची परंपरा असतानाही त्यांच्याकडे प्रभारी सहकार आयुक्तपदाची धुराही सोपवण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here