वाचा:
शिर्डीतील येथे लावण्यात आलेला पोषाखासंदर्भातील बोर्ड काढण्यासाठी येत असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना आज, गुरुवारी पोलिसांनी नगर हद्दीमध्ये प्रवेश करताच रोखले. तृप्ती देसाई व भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुपे टोलनाक्याजवळ ताब्यात घेऊन सुपा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुपा येथूनच देसाई यांना परत पुण्याला पाठवण्यात आले. कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला. मात्र, पुण्याला परतताना देसाई यांनी साई संस्थानला ३१ डिसेंबरपर्यंत बोर्ड काढण्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत बोर्ड न काढल्यास ३१ डिसेंबरनंतर शिर्डीला येऊन आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वाचा:
‘शिर्डी संस्थानने पोषाखासंदर्भातील बोर्ड हटवला नसल्यामुळे आज आम्ही शिर्डीला निघालो होतो. पण नगरच्या हद्दीवरच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले,’ असे सांगत तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, ‘जीविताला धोका असल्यामुळे शिर्डीला तुम्हाला जाता येणार नाही, या अटीवरच आम्हाला सोडण्यात आले आहे. परंतु आम्हाला ताब्यात घेतल्यानंतर शिर्डीत जल्लोष साजरा करण्यात आला. जेथे सबका मालिक एक असे साईबाबांनी सांगितले तेथे महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जल्लोष केला जात असेल तर ही महिलांचा अपमान करणारी मानसिकता शिर्डीत आम्हाला विरोध करणाऱ्यांमध्ये आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आमचे आंदोलन आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकारी हा बोर्ड लावून त्या माध्यमातून हिरावून घेण्याचा प्रयत्न संस्थानने केला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
वाचा:
‘मंदिरात लावण्यात आलेल्या बोर्डला आमचा हात लागू नये, यासाठी तो उंचावर नेण्यात आला. परंतु बोर्ड उंचावर लावण्यापेक्षा काढून टाकला असता, तर संस्थानचे आम्ही अभिनंदन केले असते. आता संस्थानने ३१ डिसेंबरपर्यंत बोर्ड हटवला नाही, तर आम्हाला पुन्हा येऊन बोर्ड हटवावा लागेल. साई संस्थानची भूमिका अयोग्य आहे. ते म्हणतात आम्ही आवाहन केले आहे. पण मला वाटते हा फतवा आहे, व फतवा हा तालिबानमध्ये काढला जातो. म्हणून जर संस्थानने ३१ डिसेंबरपर्यंत हा बोर्ड काढला नाही, तर संस्थानला तालिबानी पुरस्कार देईल व निषेध नोंदवेल,’ असा इशाराही देसाई यांनी दिला.
‘त्या’ संघटनांनी आम्हाला पुण्याला का नाही थांबवले ?
‘पुण्यातून काही संघटना आम्हाला शिर्डीत विरोध करण्यासाठी येतात. खरतरं मी पुण्यातून निघाले, तेव्हा पुण्यातच त्यांनी थांबवले पाहिजे होते. शिर्डीत आम्ही जाणारच, यासाठी आम्ही निघालो होतो. परंतु कायदा व सुव्यवस्थेमुळे आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आमच्यावर स्टंटबाजीचा आरोप चुकीचा आहे. उलट पुण्यातून काही संघटना शिर्डीत जाऊन आमच्या विरोधात आंदोलन करतात, तर तो त्यांचा स्टंट आहे. त्यांनी मला पुण्यातच अडवणे गरजेचे होते. विरोध करणे विरोधकांचा अधिकार आहे. आमचे एवढेच मत आहे, साई संस्थानने तो बोर्ड हटवला पाहिजे,’ असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times