वाचा:
डोहाळजेवण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गर्भवती महिला आणि तिचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा येतो. पण नगरच्या सावेडी उपनगरातील रहिवासी भगवान व प्रभावती कुलकर्णी कुटुंबियांनी त्यांच्याकडे असणाऱ्या लहासा अॅप्सो जातीच्या ‘ल्युसी’ या श्वानाचे डोहाळजेवण केले. ल्युसी ‘गुड न्यूज’ देणार असल्याचे कळताच तिचे साग्रसंगीत डोहाळजेवण साजरे करण्याचा निर्णय घेत जय्यत तयारी कुलकर्णी यांनी केली. एका टीव्ही वाहिनीवरील डान्स स्पर्धेतील विजेता व अभिनेता राहुल कुलकर्णी व शैला कुलकर्णी यांनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले. डोहाळजेवण कार्यक्रमासाठी सजवलेला झोका व धनुष्यबाण, परिसरात फुलांची सजावट, लाऊडस्पिकरवर पारंपारिक गाणी लावण्यात आली. एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळजेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे ल्युसिलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून व हेअरस्टाईल करून नटवण्यात आले. परिसरातील महिलांनी तिला औक्षण करून ओटीही भरली. हा सर्व प्रकार ल्युसीला समजत नसला तरीही ती झोक्यावर शांत बसून हे सगळे करवून घेत होती. पेढा की बर्फीच्या वाट्या ल्युसी पुढे धरल्या असता तिने बर्फीच पसंत केल्यावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. गोड अल्पोपहाराने या अनोख्या डोहाळेजेवणाच्या सोहळ्याची सांगता झाली. मात्र, या डोहाळजेवणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times