या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होती. पोलिसांकडून कागदपत्रे उशिरा आल्याने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. सोबत पोलिसांनी बोठे याला स्वत: हजर करण्यात यावे, अशा विनंतीचा अर्जही केला आहे. हे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष कोर्टातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी तंबी दिली. प्रसार माध्यमे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त होताना जपून लिहावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न होता कामा नये, जर असे प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले जातील, असेही कोर्टाने बजावले.
आरोपीचे वकील अॅड. महेश तवले यांनी काही कथित समाजसेवक या प्रकरणाबद्दल आणि कोर्टाबद्लही सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट करीत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कोर्टाने कुठे काही आक्षेपार्ह आढळून आले तर, त्याच्या प्रिंट काढून कोर्टात सादर करा, अशा सूचना तवले यांना दिल्या.
बोठेचा शोध सुरूच
दरम्यान, बोठे याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांना शोध घेतला आहे. याशिवाय अन्य पुरावे मिळविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, तपासाच्या दृष्टीने सर्वच माहिती उघड करणे शक्य होणार नाही.
रेखा जरे प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. काल, गुरुवारी दोन ठिकाणी पोलीस पथकाने बोठेच्या शोधार्थ धाडी टाकल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही. तर दुसरीकडे आज सुद्धा विशेष पथक बोठेच्या शोधार्थ जिल्ह्यामध्ये पाठवले आहे . रेखा जरे हत्या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील सहावा आरोपी पत्रकार बाळ बोठे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी रेखा जरे यांच्या घराची, तसेच या प्रकरणातील आरोपी राहुल भिंगारदिवे व बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times