म. टा. प्रतिनिधी, सांगली: शहरासह जिल्ह्यात सुरू असलेले घरफोड्यांचे सत्र रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. चोरट्यांनी येथील डॉक्टरांचा बंगला फोडून २५ हजार रुपयांच्या रोकडसह पावणेतीन लाखांचा ऐवज लांबवला. विट्यातही चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे, तर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. जबरी चोरी, , सोनसाखळी यांसह वाहनचोरीच्याही घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यातून काही चोऱ्यांचा छडा लागला. मात्र, चोऱ्यांचे सत्र थांबवण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. तासगावमधील डॉ. सुरेश शिवाजीराव पोवार (वय ४५) हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांचा बंद बंगला फोडला. गुरुवारी दुपारी परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी २५ हजारांच्या रोकडसह अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याबाबत त्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

विट्यातील शाहूनगरमध्येही घरफोडीचा प्रकार घडला. याबाबत तृप्ती रवींद्र लिमये (वय २७, रा. शाहूनगर, विटा) यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. लिमये या घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात जाऊन पाहिल्यानंतर बेडरुमच्या कपाटामधील साहित्य विस्कटलेले होते. कपाटातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी, तांब्याची भांडी चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी विटा पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here