म. टा. प्रतिनिधी, : प्रेमसंबंधांना विरोध केल्याने प्रेयसीच्या आजी व लहान भावाची हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीने स्वत: मानकापूर रेल्वे रुळावर आत्महत्या केली. त्याने घटनेच्या काही तासांतच आत्महत्येचा निर्णय घेतला. दुपारी २.३०च्या सुमारास त्याने आजी व नातवाची हत्या केली. त्यानंतर रात्री १०च्या सुमारास रेल्वे रुळावर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तो आपल्या एका मित्राशी फोनवर बोलला. ‘सब खतम हो गया, मै जान दे रहा हू,’ हे त्याचे शेवटचे शब्द होते.

लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०. रा. हजारीपहाड) आणि यश मोहन धुर्वे (वय १०) अशी या प्रकरणातील मृतकांची नावे आहेत. लक्ष्मीबाईंची २० वर्षीय नात आणि १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. या मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिचे वडील पेंटिंगचे काम करतात. आरोपी मुलगा हा तरुणीपेक्षा वयाने लहान होता. तसेच अन्य विविध कारणांमुळे तरुणाच्या कुटुंबीयांचा या प्रेम संबंधांना विरोध होता. काही दिवसांपूर्वी याबाबत त्यांच्यात एक बैठक झाली. या बैठकी दरम्यान दोघांमध्ये ‘ब्रेक अप’ झाले. यावरून तो चिडला होता. त्यानंतरही तो तिला फोन करीत असे. मात्र, या तरुणीने फोन व ‘मेसेज’ला प्रतिसाद देणे बंद केले होते. तिचे वडील फोन उचलत असत आणि आरोपीने आपल्या मुलीपासून दूर रहावे असे त्याला सांगत. यामुळे तो चिडला होता. त्याने रागाच्या भरात तरुणीचे हजारीपहाड येथील घर गाठले. ती घरी नव्हती. घरी केवळ लक्ष्मीबाई आणि यश हे दोघेच होते. ‘मला तिला भेटायचे आहे. तिला कोणत्या नातेवाइकाकडे ठेवले आहे’, अशी विचारणा त्याने लक्ष्मीबाई यांच्याकडे केली. त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. रागाच्या भरात त्याने लक्ष्मीबाई आणि यश यांची चाकू भोसकून हत्या केली.

तेव्हाच तक्रार करायची होती

‘मै तेरे पुरे खानदान को मिटा दुंगा,’ अशी धमकीही त्याने यापूर्वी दिल्याचे समजते. मात्र तो खरच या थराला जाईल याची कल्पना धुर्वे कुटुंबीयांना नव्हती. तेव्हाच त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असती, तर कदाचित हा प्रसंग टाळला असता अशी चर्चा आता हजारीपहाड परिसरातील नागरिकांमध्ये आहे.

वडिलांनी घरी बोलाविले होते

आरोपी हा मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचा ‘फेब्रिकेशन’चा व्यवसाय आहे. त्याला एक लहान बहीण आहे. आरोपीच्या वडिलांनी त्याला फोन करून घरी बोलविल्याचे समजते. यावर लवकरच येतो असे उत्तर त्याने दिले होते. मात्र, तो घरी परतलाच नाही. दुपारी २.३० वाजता दोघांची हत्या केल्यानंतर तो शहरात विविध ठिकाणी फिरत होता. अखेर रात्री १०च्या सुमारास तो मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे रूळांजवळ गेला. तेथून त्याचे त्याच्या एका मित्राशी संभाषण झाले. मी जीव देत असल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितले. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

‘इन्स्टाग्राम’वरून झाली ओ‌ळ‌ख

आरोपी मुलगा आणि तरुणी यांच्या वयात अंतर आहे. ते दोघे एकत्रित शिकतही नव्हते. मात्र या दोघांची ‘इन्स्टाग्राम’वरून ओळख झाल्याचे कळते. दोघांनी एकमेकांना ‘इन्स्टाग्राम’वर ‘फॉलो’ केले. त्यानंतर दोघांची ओळख वाढली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते, असे सांगितले जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here