अश्रफ वैदुजमा अंसारी असे या आरोपीचे नाव आहे. २९ जानेवारी २०१९ रोजी अश्रफला सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायाधीश एच. जे. पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता अश्रफने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी ‘तू आणखी सहा महिने कारागृहात राहण्यास आणि दंड भरण्यास तयार आहेस का?’ अशी विचारणा केली. याच गोष्टीचा राग आल्याने अश्रफने पायातील चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. परंतु न्यायाधीशांनी प्रसंगावधान राखून बाजूला झाले. नंतर पुन्हा अश्रफने पायातील दुसरी चप्पल हातात घेऊन चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. मात्र ही चप्पल एका महिला वकिलाला लागली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अश्रफविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्याचा निकाल शुक्रवारी ठाणे न्यायालयात लागला. एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे ग्राह्य धरत न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी आरोपीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे विजय मुंढे यांनी काम पाहिले. हा खटला दोन वर्षात निकाली निघाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times