राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शासनाच्या सेवेतील कर्मचारी व अधिकारी तसेच कंत्राटी तत्वावर कार्यालयांत नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी व सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांसाठीच हा ड्रेसकोड बंधनकारक राहणार आहे. मंत्रालय तसेच सर्व शासकीय कार्यालयांतून सरकारचा कारभार चालवला जातो. ही कार्यालये एकप्रकारे राज्य शासनाचे जनमानसातील प्रतिनिधी असतात. या कार्यालयांत सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी यांची येजा असते. अशावेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अत्यंत महत्त्वाची ठरते. संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची एक विशिष्ठ छाप भेट देणाऱ्या अभ्यागतांवर पडते. त्यामुळेच या सर्वांची वेषभूषा शासकीय कार्यालयाला अनुरूप असावी यासाठीच ड्रेसकोड निश्चित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ड्रेसबाबत या आहेत गाइडलाइन्स…
– सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय असावा.
– पेहराव नेहमी व्यवस्थित असावा. महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅण्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅण्ट/ट्राऊझर पॅण्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.
– आधीच्या सूचनेनुसार खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.
– परिधान केलेले पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.
– कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे.
– महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅण्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅण्डल यांचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करू नये.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times