उल्हास पवार

देशातील ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राला ज्यांचा सार्थ अभिमान वाटावा, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आज वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. वय वाढले तरी अपार कष्ट, जिद्द, महत्त्वाकांक्षा, अविरत श्रम, वेळेचे नियोजन तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक, सहकार, सांस्कृतिक व संस्कृती या विषयातील जगातील घटनांचा मागोवा आणि सतत काळाबरोबर राहण्याची वृत्ती यामुळे ते कधी थकले आहेत किंवा थांबले आहेत, असे दिसत नाही. देश जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या मोठ्या संकटातून जात असताना देशाला वैचारिक नेतृत्व म्हणून केवळ त्यांचे नाव पुढे येते. पवार यांनी पक्ष सोडला नसता तर आजचे नेतृत्व त्यांचे असते. माझ्यासारख्या त्यांच्या जुन्या मित्राला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आजही असेच वाटते, की त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे. तसे झाल्यास देशाचे वर्तमान काही वेगळे असेल.

आजच्या तरुणाईला शरद पवार म्हणजे पावसातील सभा अशी प्रतिमा आहे. आम्ही तरुणपणी पाहिलेले पवार तर आणखी वेगळे होते. आम्ही शालेय जीवनात होतो आणि ते कॉलेजवयात. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील (बीएमसीसी) विद्यार्थी नेतृत्वामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आम्ही काँग्रेसच्या सेवादलात जाऊ लागलो आणि पवार यांच्याशी संबंध आला. माझे आई-वडील, आजोळ हे स्वातंत्र्यचळवळीशी जोडले गेलेले. आम्ही तेव्हा नाना पेठेत एका वाड्यात भाड्याच्या खोलीत राहायचो. शरदरावांचा आमच्या कुटुंबाशी स्नेह तेव्हापासूनचा. १९६२ मध्ये चीनने केलेल्या आक्रमणानंतर पुण्यात पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. फडके हौदापाशी असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक झाली. पवार यांनी तो पेचप्रसंग हाताळला.

यांचे नेतृत्त्व लोकप्रियतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांच्याबद्दल आकर्षण होते. भविष्य काळात नेतृत्व म्हणून कोण पुढे येऊ शकतो, या दृष्टीने त्यांनी आढावा घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी शरदरावांना हेरले. पवार यांच्याकडे यशवंतरावांच्या मनोकामनेला मूर्त रूप देण्याची जिद्द होती. यशवंतरावांनी शरदरावांना सर्वार्थाने राजकीय व वैचारिक वारसा दिला. शरदरावांच्या घरातले वातावरण शेतकरी कामगार पक्षाचे होते. चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाच्या दूरदृष्टीमुळे विविध विचारांच्या नेत्यांमध्ये संघर्ष राहिला नाही आणि सर्वांनी काँग्रेसचे राजकारण मान्य केले. पंडित जवाहरलाल नेहरूंचे ‘मध्याच्या डावी’कडे झुकलेल्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील प्रयोग यशस्वी होत गेले. याचे प्रतिबिंब नंतर शरदरावांच्या नेतृत्वात दिसते. ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना टिळक भवनात आमचा मुक्काम असायचा. त्यांनी जोडलेल्या अफाट माणसांचा या दिवसात जवळून परिचय झाला. केवळ पक्षीय राजकारण करत राहायचे नाही; तर सामाजिक, साहित्य, कला, खेळ, लोककला या क्षेत्राशी संबंध निर्माण करायचे, त्या क्षेत्रांतील लोकांशी संवाद ठेवायचा आणि आपला व्यासंग वाढवायचा हा यशवंतरावांनी दिलेला संस्कार शरदरावांनी पूर्ण अमलात आणून आपले नेतृत्व सखोल, व्यासंगी केले.

१९६७ च्या निवडणुकीत २७ वर्षांच्या शरद पवार यांना उमेदवारी देण्यास काहींचा विरोध होता; पण पवार यांनी निवडणूक जिंकली आणि त्यांचा आजपर्यंत पराभव झालेला नाही. याच दरम्यान प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून शरदराव, मोहन धारिया व बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ या तीन नेत्यांनी पक्षसंघटना मजबूत केली. इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाओ’चा नारा दिल्यानंतर पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. तालुका आणि जिल्हा शिबिरे घेतली. कार्यकर्त्यांशी केलेला संवाद, चिंतन, बौद्धिक चर्चा यामुळे विचारांची घुसळण झाली. त्यांनी मारलेली भरारी सर्वांच्या नजरेत नेतृत्व म्हणून उभी राहिली नसती तरच नवल. यशवंतरावांना मानणारा वर्ग शरद पवारांना मिळाला. माझाही राजकीय प्रवास सुरू होता. १९७१ मध्ये मी पुणे युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आणि पुढच्या वर्षी प्रदेशाध्यक्ष झालो. या माझ्या सात वर्षांच्या काळात शरदराव खंबीरपणे बरोबर होते. बुद्धी, आकलन, निरीक्षण हे गुण स्वकष्टाने कसे कमवायचे आणि त्याला चिंतनाची जोड कशी द्यायची हे आम्ही पाहत होतो.

शरदरावांनी कोणत्याची कार्यक्रमाचा औचित्यभंग केलेला मी कधी पाहिला नाही. ते कधीही विषयांतर करत नाहीत. आपण कुठे आणि कोणासमोर बोलणार आहोत तसेच तिथे काय बोलायचे आहे, याची पूर्ण तयारी त्यांनी केलेली असते. त्यांचे सगळे निर्णय किंवा राजकारण कोणाला आवडणार नाही; पण व्यक्तिमत्त्व कसे फुलवायचे, स्वत:ला काळाशी जोडून कसे उन्नत करायचे आणि बहुश्रुत व्हायचे, यासाठी आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनाकडे एक अभ्यास म्हणून पाहिले पाहिजे. अमुक गोष्ट जमणार नाही, असे वाक्य त्यांच्या जीवनात नाही. कितीही कठीण बाब प्रयत्नपूर्वक साध्य करता येते, ही बाब पवार यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राला दाखवून दिली. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात विरोधकही शरदरावांचे वडीलकीचे नाते मान्य करतात. एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कोणताही राजकारणी पवार यांच्याबद्दल अद्वातद्वा बोलताना दिसणार नाही.

आज महाराष्ट्रात जातीचा संघर्ष उभा ठाकला आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी जातीय तणाव हाणून पाडला पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आणि ताकद केवळ पवारांकडे आहे. जातीय व धार्मिक राजकारण देशाच्या एकतेला आणि अखंडतेला घातक आहे, असे म्हणून यशवंतरावांनी लोकमान्य टिळक-महात्मा गांधी यांचा मार्ग चोखाळला. शरदरावांवर तोच संस्कार झाला. तोच अमलात आणण्याची गरज आहे. जातीय व धर्मांध शक्ती, धार्मिक ध्रुवीकरण, जातीचे राजकारण हे संपवण्याचे सामर्थ्य केवळ शरदरावांकडे आहे. आजचे कमी आवाका असलेले लोक पाहिले की हे समाजाला घडवत आहेत की बिघडवत आहेत, असा विचार मनात येतो. पवार यांनी भवतालातील सारे प्रश्न मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्वाने मिटवले तर असा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र आणण्याची किमया साधल्यानंतर पन्नास वर्षांनी तीच किमया केवळ शरदरावांमुळे साधली गेली. शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी आघाडी करून हिंदुत्व सोडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर हे झाले नसते, अशी टीका करणाऱ्या आजच्या लोकांना हा इतिहास माहीत नसतो. पवार आणि बाळासाहेबांच्या ऋणानुबंधातून विणली गेलेली महाविकास आघाडीची वीण घट्ट आहे.

शरद पवारांनी काँग्रेस सोडू नये असे मनापासून वाटायचे. त्यांनी आधीही काँग्रेस सोडली; पण नंतर ते पक्षात आले. १९९९ नंतर तसे घडले नाही. त्यांनी बाहेर पडू नये यासाठी आणि नंतरही पुन्हा काँग्रेसमध्ये यावे यासाठी मी अनेक प्रयत्न केले. त्यांनी काँग्रेस सोडली, तरी काँग्रेसच्या नेत्यांशी वागण्यातली सुसंस्कृतता त्यांनी कमी होऊ दिली नाही. ते आज काँग्रेसमध्ये असते तर पक्षाचे आणि देशाचे नेतृत्व त्यांनीच केले असते. सध्याच्या राजकीय अवकाशात पर्याय म्हणून पाहताना पवार यांचे नाव पुढे आले असते. देशातील सर्व नेत्यांची मोट बांधण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांमध्ये कमालीचा आदर आणि जिव्हाळा आहे. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींना भेटलेल्या नेत्यांचे नेतृत्वही पवार यांच्याकडे येते, हे त्यामुळे अगदीच साहजिक आहे. पवार यांनी काँग्रेसमध्ये यावे, ही माझी भावना आजही टिकून आहे.

(लेखक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here