शरद पवार हे आज ८० वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये आज पवारांवर खास अग्रलेख आहे. त्यातून पवारांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक करण्यात आलं आहे. पवारांच्या राजकारणावर घेतला जाणारा संशय ही केवळ हाकाटी असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
पवारांबद्दल म्हणते…
>> ‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८० असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात.
>> ८० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे ८० वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार?
>> शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत.
वाचा:
>> शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या चातुर्यानेच वाजपेयींचे सरकार एका मताने पडले, पण संसदेतील या नेत्यास विश्वासात न घेता राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या त्या अस्वस्थतेतून वैचारिक मुद्द्यांवर काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले.
>> संरक्षणमंत्री, कृषीमंत्री म्हणून केंद्रातली पवारांची कारकीर्द दमदारच होती. पवारांवर कायम संशय घेण्यात ज्यांनी धन्यता मानली ते पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे राजकारणातून नामशेष झाले. त्यांना आपले जिल्हेही सांभाळता आले नाहीत.
>> पवार उद्योगपतींना मदत करतात असा आरोप केला जातो. उद्योगपती नसतील तर राज्याची प्रगती कशी होणार? याचे उत्तर कोणीच देत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येतात व उद्योगपतींना भेटतात, ‘उत्तर प्रदेशात चला’ असे आमंत्रण देतात ते कशासाठी?
>> पवार यांनी उद्योगपतींना मोठे केले तसे शेतकरी आणि सहकार क्षेत्रासही बळ दिले. खासगीकरणाचा जोरदार पुरस्कार पवार करीत राहिले. खासगी क्षेत्रातून त्यांनी ‘लवासा’सारखी सौंदर्यस्थळे निर्माण केली, पर्यटन उद्योगास बळ दिले. त्यातून रोजगार व महसूल निर्माण केला. तेव्हा व्यक्तिद्वेषाने पछाडलेल्या राजकारण्यांनी हे प्रकल्पच मोडीत काढून महाराष्ट्राचे नुकसान केले. ‘लवासा’सारखे प्रकल्प इतर राज्यांत निर्माण झाले असते तर महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले असते, पण देशातल्या राजकारण्यांनी अनेक वर्षे फक्त ‘पवार विरोध’ हेच राजकारण केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times