मुंबई : लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळेच पाश्चिमात्य देशांमध्ये सरकारवर नजर ठेवण्यासाठी ही संकल्पना अस्तित्वात आली. सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर विरोधी पक्षातील हे शॅडो कॅबिनेटमधील नेते सावलीसारखी नजर ठेवतात. महाराष्ट्रात मनसेनेही आता शॅडो कॅबिनेटचा प्रयोग करण्याचा निर्धार केला आहे. राज्यात शॅडो कॅबिनेटचा प्रयोग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दिवंगत नेते विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेना आणि भाजपने शॅडो कॅबिनेटचा प्रयोग केला होता.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय
?

पाश्चिमात्य देशात आणि विशेषतः ब्रिटनमध्ये शॅडो कॅबिनेट ही संकल्पना रुढ आहे. विरोधी पक्षाकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना केली जाते. ही शॅडो कॅबिनेट सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची विविध बाजूने पडताळणी करते. शॅडो कॅबिनेटद्वारे गृह, वित्त, कृषी अशा विविध खात्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र नेत्याची नेमणूक केली जाते.

विरोधी पक्षातील ज्या नेत्याला संबंधित खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी तो नेता जबाबदार असतो. शॅडो कॅबिनेट ही अनौपचारिक असून या कॅबिनेटचा कोणताही निर्णय बंधनकारक नसतो. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये ही संकल्पना रुढ आहे. विविध देशात शॅडो कॅबिनेटला स्थानिक नावांनुसार ओळखलं जातं.

भारतातील शॅडो कॅबिनेटचे प्रयोग

मनसेने शॅडो कॅबिनेटचा घेतलेला हा पहिलाच निर्णय नाही. भारतातही राज्य स्तरावर अनेक शॅडो कॅबिनेटचे प्रयोग झाले. २००५ मध्ये आघाडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती. याशिवाय काँग्रेसनेही मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लक्ष्य करण्यासाठी २०१४ मध्ये शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. गोव्यातही एका संस्थेकडून २०१५ मध्ये शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती.

नुकताच केरळमध्येही शॅडो कॅबिनेटचा प्रयोग करण्यात आला. नागरी सोसायटीच्या सदस्यांनी सरकारवर नजर ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली, ज्यात सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत यांचा समावेश आहे.

विरोधकांना फायदा काय
?

लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला जनतेचा आवाज म्हटलं जातं. त्यामुळे जनतेच्या समस्या योग्य पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटचा फायदा होतो. संसदीय कामकाजातही यामुळे पारदर्शकता येते. शॅडो कॅबिनेटमधील नेते स्वतःचा स्वतंत्र प्रस्तावही तयार करू शकतात, जो सरकारला सादर करता येईल.

काय आहे ब्रिटनच्या शॅडो कॅबिनेटचं वैशिष्ट्य?
ब्रिटनच्या संसदीय व्यवस्थेत शॅडो कॅबिनेटला अत्यंत महत्त्व आहे. सरकारला समानांतर अशी ही शॅडो कॅबिनेट विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्त्वात काम करते. प्रत्येक शॅडो मंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यात समानांतर व्यवस्था आणि दोघांची स्वतंत्र यंत्रणा असते. शॅडो मंत्र्याला कोणतेही अधिकार किंवा वेतन दिलं जात नाही, पण सरकारवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. विधेयकांवर सभागृहात सखोल चर्चा आणि अभ्यास, एकाधिकारशाहीला आळा अशा अनेक गोष्टी शॅडो कॅबिनेटमधून साध्य केल्या जातात.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here