औरंगाबादः ‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात म्हणून झाली,’ असा सणसणीत टोला यांनी भाषणाचा सुरुवातीलाच विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना व बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व सफारी पार्क तसंच अन्य योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं ठाम अश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांना दिलं आहे. तसंच, ‘आता आम्ही फक्त घोषणा करणार नाही. माझ्या कावडीने जर कोणाच्या घरात पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल तर ते मोठं पुण्य आहे आणि ते मिळवायला भाग्य लागतं,’ असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

‘फक्त भूमिपूजन करुन मी शांत बसणार नाही. मी कधीही, न सांगता न कल्पना देता या कामाची प्रगती बघायला येणार आहे. गेल्या आठवड्यातही समृद्धी माहामार्गाची पाहणी केली नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा हा महामार्ग १ मेपर्यंत सुरू होतोय. नुसत्या घोषणा नाहीत,कामांना गतीही देतोय. गती नसेल तर त्याला काही अर्थ नसेल. हा महामार्ग झाल्यानंतर औरंगाबादचे महत्त्व आणखी वाढणार आहे,’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

‘पाण्याचा प्रश्न, गुंठेवारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. या शहराच्या गुंठेवारीच्या बाबतीत मी सकाळीच सूचना दिल्या आहेत आणि तोही प्रश्न लवकरात लवकर सोडवल्याशिवाय राहणार नाही. सिडकोतील घरांचा प्रश्न, मालकी हक्काचा प्रश्न याबद्दलही सूचना दिल्या आहेत,’ असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे.

‘निवडणूका आल्या म्हणून विकास कामे करायला आलो नाही. कोव्हिडमुळं ही कामे रखडली होती. आता प्रादुर्भाव थोडा कमी झाला आहे. त्यामुळं आता पुन्हा वेगानं कामं होतील. औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना रखडली होती. कोणामुळं रखडली होती हे माहिती नाही, पण माझ्या प्रयत्नानं का होईना कोणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्त्वाचं आहे,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘करोनाचे आकडे खाली आलेत म्हणून मास्क खाली करू नका. साथीच्या रोगांसोबत करोना आला तर बिकट संकट आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही, पण ते येणार नाही ही मला खात्री आहे कारण आपण सगळे समजूतदार आहात,’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here