केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या आंदोलनात शेतकरी नसून दुसरेच लोक आहेत. पाकिस्तान आणि चीनकडून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात असल्याचे वक्तव्य केले होते. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.
त्या अनुषंगाने आज जळगावात शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला कार्यकर्त्या शोभा चौधरी, सरिता माळी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महिलांनी भरवल्या बांगड्या
आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या भरवल्या. त्याचप्रमाणे सर्व आंदोलकांनी दानवे यांच्या पुतळ्याला बांगड्या भरवून त्यांना आता तरी अक्कल येईल, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपचे मंत्री नेहमी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
इंधन दरवाढीचाही नोंदवला निषेध
या आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times