विस्ट्रॉनच्या कंपनीच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूर प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. संतप्त कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली आणि कार्यालयावर दगडफेक केली. कंपनीच्या काही वाहनांना आगही लावली. प्लांटमधील बहुतेक कामगार कॉन्ट्रॅक्टवर आहेत. त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. पगाराच्या अनेक प्रकारची कपात करण्यात येत असल्याने कर्मचारी नाराज आहेत, असं कामगार संघटनेच्या एका नेत्याने सांगितलं. हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. अशा कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य व्यवस्था तयार आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. अश्वतनारायण म्हणाले. त्यांनी या प्रकरणी ट्वीट केलं. अश्वतनारायण हे कर्नाटके आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री देखील आहेत. जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई केली जाईल. यासोबतच कर्मचार्यांचं हित जपलं जाईल आणि त्यांना थकीत पगार देण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिले. विस्ट्रॉन कंपनी नरसापूर प्लांटमधील कर्मचार्यांची संख्या दोन हजारांवरून वाढून आठ हजार इतकी करणार आहे. कर्मचारी संख्या वाढवण्याची तयारी कंनी करत आहे. नरसापूरमध्ये विस्ट्रॉन कंपनीचं उत्पादन आणि सेवा केंद्र आहे. इथे अॅपल कंपनीचे आयफोन 7 (IPhone7), लिनोव्हो आणि मायक्रोसॉफ्टची काही उत्पादनं देखील तयार होतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times