म.टा. प्रतिनिधी, नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याचा शोधा शोध करून ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिसांनी नागरिकांना साद घातली आहे. आरोपी बोठे याच्या बाबत काही माहिती असल्यास ती आम्हाला द्या, असे आवाहनच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे पसार आहे. बोठे याचा पोलीस कसून शोध घेत आहे. त्यासाठी नगर जिल्ह्याच्या बाहेर पथके पाठविण्यात आले आहेत. मात्र अद्याप बोठे सापडला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी थेट नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच आरोपी बोठे याच्या घराची व कार्यालयाची आज पुन्हा एकदा झाडाझडती घेण्यात आली आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की,’आरोपी बोठे याच्या घरी व ऑफिसमध्ये आज आह्मी झाडाझडती घेतली. याठिकाणी काही ठोस पुरावे आम्हाला मिळाले आहेत. आरोपी बोठे बद्दल माहिती मिळवण्यास पोलीस प्रयत्नशील आहेत. आम्ही विश्वास बाळगतो की लवकरात लवकर त्याला अटक करू. मात्र नागरिकांना देखील आमचे आवाहन आहे की याबाबत कुठलीही माहिती कोणाकडे असेल, तर निश्चित पोलिसांना द्या. या संदर्भातील जी गोपनीयता आहे, ती बाळगली जाईल.

दरम्यान, रेखा जरे हत्या प्रकरणात आरोपी बोठेचे नाव हे तीन डिसेंबर रोजी आले. तेव्हापासून बोठे हा पसार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे कसून प्रयत्न सुरू असले तरी त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आरोपी बोठेला पकडण्यासाठी थेट नागरिकांकडे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. आता याचा कितपत फायदा होणार? याकडे लक्ष लागले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here