दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या आठड्यात भारत बंद पुकारण्यात आला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून १४ डिसेंबरपासून पुन्हा देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. ठिकठिकाणी धरणे, निदर्शने यांच्या माध्यमातून या कायद्यांना विरोध दर्शविण्यात येणार आहे.
विरोधाचा हा आवाज मोठा होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आता थेट मैदानात उतरून नागरिक व शेतकरी यांचे प्रबोधन करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करू कायद्यांची माहिती देण्यात आली. आता त्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार १४ डिसेंबरच्या आंदोलनापूर्वीच सरकारची बाजू भक्कमपणे लोकांसमोर आणण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार सर्व जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नेते पत्रकार परिषद घेऊन या कायद्यांची माहिती देणार आहेत. त्यासोबतच विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरे देण्याचीही तयारी करण्यात आली आहे. त्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. त्यासाठीचे प्रचार साहित्य तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून कृषी कायद्यांची आणि त्यांच्या फायद्यांची माहिती शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहचवून गैरसमज दूर करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
आतापर्यंत वरिष्ठ नेत्यांकडून या कायद्यांचे समर्थन केले जात होते. त्यासोबतच विरोधकांवर आणि आंदोलकांवर टीकाही केली होती. त्यातील काही नेत्यांची विधाने वादग्रस्त ठरून पक्षाच्या अंगलट आली आहेत. शेतकरी आंदोलनासोबतच या नेत्यांच्याविरोधातही आंदोलने सुरू झाली आहेत. काही नेत्यांनी शेतकऱ्यांना प्रतिआंदोलन करण्याचे आवाहनही केले होते. आता त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन कायद्याची माहिती पोहोचविण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times