करोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईमधील रेसकोर्सवर करोना क्वारंटाईन सेंटर बनविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील शर्यती पुण्यातील रेसकोर्स येथे होत आहेत. रेसकोर्समध्ये शासकीय परवाना घेतल्यानंतरच सर्व टॅक्स भरून बेटिंग घेणार्यांना परवाना दिला जातो. मात्र, काही जण पुण्यात टीव्हीवर शर्यती पाहून त्यावर ऑनलाइन व दुसऱ्याच्या नावे असलेल्या सीमकार्डवरून बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून हडपसर येथे एक, कोंढवा येथे दोन आणि वानवडी येथे तीन अशा पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी सहा गुन्हे दाखल करून पोलिसांनी बेटिंग घेण्यासाठी वापरल्या जाणारे ३१ मोबाईल, सहा लॅपटॉप, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.
डोंबरवाडी परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळील येथे मोकळ्या जागेमध्ये शुक्रवारी दुपारी बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून २० जणांना अटक केली. याप्रकरणी उपनिरीक्षक हणमंत गिरी यांनी तक्रार दिली आहे. तर, वानवडीतील नॅन्सी टॉवर कारवाई करून मुशील सुलतान बरेलवी याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी तक्रार दिली आहे. वानवडीतील पद्मविला सोसायटी परिसरात केलेल्या कारावईत शब्बीर मोहसीन खंबाटी (रा. पद्मव्हिला सोसायटी, वानवडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी तक्रार दिली आहे. या ठिकाणाहून ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घोड्याच्या शर्यतीवर बेटींग घेणाऱ्यांवर कारवाई होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times