टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. रिपब्लिकसंबंधित ही दुसरी अटक असून या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. या प्रकरणात थेट सहभाग दिसून आल्याने रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक करण्यात आल्याचा दावा रिपब्लिक टीव्हीनं केला आहे. यावर भाजपकडूनही टीका करण्यात येत आहे.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरु आहे, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी संबंधित एजन्सीजना हाताशी धरून कशाप्रकारे एक मोठे रॅकेट कार्यरत होते, याची तपशीलवार माहिती आयुक्तांनी दिली. यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ हे तीन चॅनेल गुंतले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली होती. मुंबईत बसवण्यात आलेल्या सुमारे २ हजार बॅरोमीटर्सचा वापर टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी केला जात असल्याचेही तपासात आढळले आहे. जे चॅनेल यात गुंतले आहेत त्यांनी आपलाच चॅनेल घरात लावून ठेवावा म्हणून घरोघरी ४०० ते ५०० रुपये वाटल्याचेही पुरावे हाती लागले आहेत. या चॅनेल्ससाठी काही जण काम करत होते. ते दर महिन्याला घरोघरी जात होते व पैसे वाटत होते, असेही स्पष्ट झाले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times