नगर जिल्हा भाजपच्या वतीने आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर आदी उपस्थित होते. नगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या बिबट्याच्या प्रश्नावरुन यावेळी शिंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.
‘नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरला हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीच्या प्रश्नापुढे आपल्या जिल्ह्यातील बिबट्याचा प्रश्न सोडवणे अवघड नाही,’ असे स्पष्ट करतानाच हसन मुश्रीफ यांनी हत्ती पकडण्याचे, हत्ती पळवून लावण्याचे त्यांचे कौशल्य बिबट्याच्या संदर्भात जिल्ह्यात लावावे, असा टोलाच भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मुश्रीफ यांना लगावला.
‘आपले पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे तेथे हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीच्या प्रश्नापुढे बिबट्याचा प्रश्न सोडवणे अवघड नाही. परंतु तो सोडवण्यासाठी त्यांची मानसिकता नाही. योग्य तो आदेश वन विभागाला ते देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतीच्या कामासाठी शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हसन मुश्रीफ यांनी हत्ती पकडण्याचे, हत्ती पळून लावण्याचे त्यांचे कौशल्य हे बिबट्याच्या संदर्भात जिल्ह्यात लावले, तर जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समाधानी होतील. शेतकरी भयभीत राहणार नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
विजेचा प्रश्नावरून शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र तोच आहे. या महाराष्ट्रात २०१९ पूर्वी कधीही लाईट जात नव्हती, डीपी जळल्याच्या तक्रारी होत नव्हत्या, ऑइल संपत नव्हते आणि संपले तरी तात्काळ देत होतो. पण त्याच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अडचणीत आला आहे, त्याला लाईट वेळेवर मिळत नाही, मिळाली तर पूर्ण दाबाने मिळत नाही. अशा पद्धतीने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय विजयाच्या संदर्भात नैराश्याचे वातावरण आहे. त्यावर शिरजोड म्हणून वीज बिल भरावे यासाठी तगादा लावला जातोय,’ असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times