म.टा.प्रतिनिधी, नगर: राज्य सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निश्चित केला आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना हिंदू जनजागृती समितीने मात्र आता राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरुप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्यासाठी ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे समितीच्या वतीने तसे पत्रही मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली, व तसा बोर्ड देखील मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावला. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला होता. त्यानंतर या वादात हिंदू जनजागृती समितीनेही उडी घेतली होती. येथील साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार पोषाख लागू करावा, असे आवाहन सर्व मंदिर विश्वस्तांना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी केले होते.

त्यातच आता राज्य सरकारने सुद्धा आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला, व यानिमित्ताने पुन्हा एकदा हिंदू जनजागृती समितीने सर्वच मंदिरामध्ये ड्रेसकोड लागू करण्याची मागणी केली आहे. हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.

या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचा ड्रेसकोड लागू करावा. हा ड्रेसकोड लागू केल्यामुळे मंदिरातील पावित्र्य आणि श्रद्धाभाव टिकून राहण्यास साहाय्य होईल. भारतीय वस्त्र पाश्‍चत्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये सार्थ स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पारंपारिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा,’ अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here