करोनानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा १० ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी २ जानेवारीपर्यंत पोहोचायचे आहे. बीसीसीआयने स्पर्धेसाठी सहा केंद्र बनवली आहेत, या केंद्रांमध्ये खेळाडूंना २ जानेवारीपर्यंत पोहोचायचे असून त्यानंतर ही स्पर्धा सुरु करण्यात येणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज सर्व राज्य संघटनांना या स्पर्धेबाबत इमेल द्वारे माहिती दिली. त्यानंतर सर्व राज्य संघटना याबाबत आपले मत व्यक्त करणार आहे. त्यानंतर या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा प्रथम खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या स्पर्धेच्या आयोजनानंतर रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
ही स्पर्धा नेमकी कशी खेळवली जाते, यावर बीसीसीआयच्या पुढच्या स्पर्धांचे आयोजन अवलंबून असेल. कारण करोनानंतर भारतामध्ये ही पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत किती अडचणी येतात, ही बीसीसीआयला कळेल. त्यानंतरच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा विचार केला जाईल. त्यामुळे बीसीसीआयने पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० क्रिकेटचा मार्ग निवडला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा ही जास्त वेळ चालत नाही. त्यामुळे कमी कालावधी ही महत्वाची स्पर्धा बीसीसीआयला आयोजित करता येणार आहे.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव या स्पर्धेबाबत म्हणाला होता की, ” टी-२० विश्वकरंडक स्पर्धा जर रद्द झाली तर सय्यद मुश्ताक अली टी-२० स्थानिक क्रिकेट स्पर्धा व्हावी. मुश्ताक अली स्पर्धा खेळविणे शक्य झाले तर त्यामुळे आपोआपच सराव होईल. ही दोन आठवड्यांची स्पर्धा असते आणि त्यामुळे खेळाडूंना एक लय सापडेल.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times