म. टा. प्रतिनिधी, पुणेः खडकी येथील होळकर पुलाच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारातील झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, बिब्वे, फोटो, लिंबू आणि चिठ्ठ्या अशा वस्तू दाभण, खिळे आणि साळींदरच्या काट्याच्या साह्याने झाडामध्ये ठोकण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हे साहित्य बाजूला काढून जाळले आणि झाडांना या कचाट्यातून मुक्त केले.
‘करणी लावण्यासाठी किंवा करणी काढण्यासाठी म्हणून अशा अंधश्रद्धेचा उपयोग करून लोकांना फसवले जाते. अनिष्ट, अघोरी प्रकार करून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले जात आहे. या अंधश्रद्धेला कोणी बळी पडू नये. यासाठी झाडांना लावलेल्या हजारो काळ्या बाहुल्या काढून झाडांना मुक्त करण्यात आले,’ असे महाराष्ट्र अनिंसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सांगितले. नंदिनी जाधव यांच्यासह श्रीराम नलावडे, विजय सुर्वे, भगवान काळभोर, रामचंद्र कदम, राजू कदम, शुभम जाधव, स्वप्नील पंडित यांनी धाडसाने ही मोहीम पूर्ण केली.

खडकी पोलिसांची टाळाटाळ

झाडांना बाहुल्या लावण्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी चार वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. याबाबत खडकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. वारंवार घडणाऱ्या या प्रकारात गुन्हा नोंद करून तपास करणे गरजेचे आहे. मात्र खडकी पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, असा आरोप महाराष्ट्र अनिंसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here