भारतात सर्वसाधारणपणे पावसाळा, उन्हाळा व हिवाळ्याचे महिने ठरलेले आहेत. त्या-त्या महिन्यात साधारणपणे तो-तो ऋतू असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्रात बरेच बदल झालेले दिसत आहेत. जूनमध्ये सुरू होणारा मान्सून पुढेपुढे सरकू लागला आहे. तर, सप्टेंबरपर्यंत गायब होणारा पाऊस ऑक्टोबरपर्यंत ठाण मांडू लागला आहे. यंदा तर पावसानं कमाल केली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही हिवाळी महिन्यात पावसानं कुठे न कुठे हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिमझिम सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसानं मुंबई, पुणे व कोकण किनारपट्टीवर हजेरी लावली होती. आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली. या पावसात जोर नसला तरी छत्रीशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, अशी गोची करून ठेवली आहे.
वाचा:
दक्षिण मुंबईत काल मध्यरात्री चांगल्या सरी कोसळल्या. त्यानंतर आज सकाळपासून उपनगरांमध्ये रिमझिम सुरू आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाऊस सुरू आहे. पनवेलमध्ये देखील जोरदार सरी कोसळल्या.
सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत असलेल्या नाशिक शहरात रविवारी रात्रीपासूनच पाऊस होत आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तिथं ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील अनेक भागांत रिमझिम सुरू आहे. आर्द्रता ९१ टक्क्यांवर असल्यानं शहरात धुकंही दाटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times