करोनाचे संकट आणि विकासकामांसाठी पुरेसे निधी नाही. मात्र, मंत्र्यांच्या बंगले व दालनावर कोट्यवधींचा खर्च झाल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. यात धनंजय मुंडे यांचा चित्रकुट बंगल्यावरही ३ कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च झाल्याचा उल्लेख आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र, या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी एक ट्विट करत या संदर्भातील बातम्यांवर खुलासा केला आहे. ‘काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मोठा खर्च केल्याच्या बातमी येत आहेत. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचंही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले आहेत. मी अद्याप तिथे एक रुपयांचाही खर्च केलेला नाहीये,’ असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च झालेलेच नाहीत. या संदर्भात मी स्वत: माहिती घेतली. काहीही बातम्या दिल्या जातात. अद्याप कुठलाही आकडा पुढे आलेला नाही, मग हा ९० कोटी खर्चाचा आकडा आला कुठून? असा सवाल करतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times