अहमदनगर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना रामदास आठवले यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले म्हणाले. भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवले यांनी केली. आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातलं तीन पक्षाचं सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राह्यचं हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्याच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आठवले यांनी यावेळी विरोध केला. आंबेडकर स्मारकाचे पैसे रुग्णालयाला देण्यास आमचा विरोध आहे. रुग्णालयासाठी सरकारने निधी द्यावा. ते बंद पडता कामा नये, पण इंदूमिलमधील स्मारकही पूर्ण झालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी आठवले यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनसीआर) पाठिंबा दिला. एनसीआरमुळे देशातील मुस्लिमांना कोणताही त्रास होणार नाही. एनसीआरबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मुस्लिमांना त्रास देणारा हा कायदा नाही. काँग्रेस मुस्लिमांना भडकवत असल्यामुळेच मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरले आहेत. मुस्लिमांनी काँग्रेसच्या जाळ्यात अडकून स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असंही ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times